• MyPassion
येऊरच्या जंगलामध्ये मद्यपी तरुणांवर कारवाई करण्यासाठी ठाणे पोलिसांकडून मोर्चेबांधणी सुरू.
20 Jul, 2019

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील येऊरच्या जंगलामध्ये पावसाळ्यामध्ये मद्यपी तरुणांचा उपद्रव वाढत असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ठाणे पोलिसांकडून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पावसाळा आणि गटारीदरम्यान या भागामध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या मंडळींची संख्या वाढत असून संवेदनशील वनक्षेत्रामध्ये धिंगाणा घातला जात असतो. जिल्हाधिकाऱ्यांकडून या भागातील पाण्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मनाई आदेश असून एक किमीच्या अंतरावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही सार्वजनिक ठिकाणी घुसखोरी करण्याचे प्रमाण असल्यामुळे या भागातील बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. आत्तापर्यंत १५ जणांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पावसाळ्यात येऊरच्या निसर्ग सौंदर्यामध्ये आमूलाग्र बदल होत असून हिरवाईने वनक्षेत्र बहरून गेले आहे. धबधबे आणि झऱ्यांची खळखळ सुरू झाली असून धुक्यांनी डोंगर परिसर निसर्गरम्य झाला आहे. या वातावरणामध्ये पर्यटकांना भुरळ घातली जात असली तरी हौशी पर्यटकांपेक्षा मद्यपी तरुण या भागात मोठ्या संख्येने दाखल होत आहे. विशेष म्हणजे या भागातील सुरक्षाव्यवस्था छेदून जंगलाच्या आडोशाला जाऊन अनेक तरुण मद्यपान करत धिंगाणा घालण्याचाही प्रयत्न करतात. पावसाळा सुरू झाल्यापासून गटारीपर्यंत या भागात मोठा गोंधळ घातला जातो. परंतु त्यावर निर्बंध आणण्यासाठी पोलिस सक्रीय झाले असून या भागातील उघड्यावरील पार्ट्यांना निर्बंध घालण्यास सुरुवात झाली आहे. येऊरच्या बंगल्यांमध्ये होत असलेल्या पार्ट्यांची संख्याही अधिक असली तरी त्यांच्यावर कारवाई करताना पोलिसांना राजकीय दबावाचाही सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. गटारीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून या भागात जनजागृती कार्यक्रम सुरू केले असून ठिकठिकाणी फलक लावून 'मद्यपी गटारीला' नकार दर्शवले आहेत.येऊरच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून सर्वच गाड्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. रिक्षा, दुचाकी पोलिसांच्या रडारवर असून त्यांची अधिक तपासणी केली जात आहे. महिला छेडछाडीसारखे प्रकार रोखण्यासाठी महिला पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली आहे. गटारीपर्यंत हा बंदोबस्त कायम राहणार असल्याचे वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश गिरीधर यांनी सांगितले.