• MyPassion
विधानसभा निवडणुकीत दिव्यांग व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नयेत,यासाठी विशेष व्यवस्था .
18 Oct, 2019

ठाणे विधानसभा निवडणुकीत एकही दिव्यांग व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांतील एकूण १० हजार ४८९ दिव्यांग मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून सर्वाधिक मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्यात आली आहेत. ठाण्यातील १८९४ मतदान केंद्रापैकी १३४६ केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्यासाठी १८०७ व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. १० ठिकाणी बससेवेचा रिंगरूट ठेवण्यात आला आहे. दिव्यांग मतदारांनी पालिका परिसरात प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी रिक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये पाच ते आठ रिक्षांची व्यवस्था असेल. तर शहापूर आणि मुरबाड परिसरात रिक्षांची व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी गाडीची व्यवस्था करण्यात आली.दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी जिल्ह्यात २३९५ स्वयंसेविकांची नियुक्ती करण्यात आली. ६१ ठिकाणी विशेष कक्ष आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यात एकूण ७ हजार ४३४ दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी दिव्यांग मतदारांचे मतदान ३४ टक्के झाले. यंदा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. दिव्यांग मतदारांना कोणत्याही ठिकाणी मतदान करताना अडचण आल्यास किंवा काही मदत हवी असल्यास त्यांनी १९५० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना मदतीची व्यवस्था करण्यात आली आहे