• MyPassion
ठाण्यात महिलांसाठी होणार स्वतंत्र कारागृह.
27 Feb, 2020

क्षमतेपेक्षा अधिक संख्येने कैदी ठेवण्यात आल्यामुळे कोंडवाडय़ासारखे बनलेल्या ठाणे मध्यवर्ती कारागृहातील महिला कैद्यांसाठी स्वतंत्र कारागृह उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने नुकताच राज्य सरकारकडे सादर केला आहे. मध्यवर्ती कारागृहाच्या विस्तीर्ण जागेतच सुमारे चारशे महिला कैद्यांना सामावून घेईल, असे कारागृह उभारण्याचा हा प्रस्ताव आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृह हे राज्यातील एक महत्त्वाचे कारागृह आहे. या कारागृहात ११०५ कैदी राहू शकतात इतकी क्षमता आहे. मात्र, सध्या त्यात तीन हजार ७०० हून अधिक कैदी आहेत. या कारागृहातील महिला विभागात केवळ २५ कैदी ठेवण्याची व्यवस्था आहे. प्रत्यक्षात मात्र, ९९ महिला कैद्यांना येथे कोंबून ठेवण्यात आले आहे. कारागृहात विविध गुंड टोळय़ांचे सदस्य शिक्षा भोगत असून त्यांच्या गटांमध्ये नेहमीच हाणामारीच्या घटना घडत असतात. महिला विभागात अपुरी स्वच्छतागृहे व अन्य सुविधांची कमतरता आहे. या पार्श्वभूमीवरमहिला कैद्यांसाठी कारागृहाच्या जागेत स्वतंत्र कारागृह उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. कारागृहाच्या ३ ते ४ एकरच्या भातशेतीच्या जागेवरील काही भागामध्ये हे कारागृह उभारण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्तावही राज्य सरकारकडे पाठविण्यात आलेला आहे. येत्या काळात या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची शक्यता आहे. जर हे कारागृह तयार झाल्यास महिला कैद्यांना उद्भवणाऱ्या समस्येपासून त्यांची सुटका होईल, असा विश्वास ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.