• MyPassion
ठाण्यात बांधण्यात येणारी मेट्रो उन्नत नको तर भूमिगत करावी, ठाणे नागरिक प्रतिष्ठानची मागणी .
14 May, 2019

ठाण्यात बांधण्यात येणारी मेट्रो-४ ही उन्नत असून यामुळे वाहतूककोंडी सुटणार कशी असा सवाल करून ती उन्नत नको तर भूमिगत करावी, अशी मागणी ठाणे नागरिक प्रतिष्ठानने पत्रकार परिषदेत केली. हा मेट्रो प्रकल्प पूर्वी हा भूमिगत राबविण्यात येत होता. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला मोठ्या प्रमाणात आळा बसून वाहतूककोंडीमुक्त ठाणे झाले असते. परंतु, ठाण्यात चेकनाका ते कासारवडवली मेट्रो प्रकल्प आता उन्नत उभारण्यात येत आहे. वडाळा ते कासारवडवली हा ३२ कि.मी ची प्रकल्प हा दोन महानगरांना जोडणारा हा प्रकल्प मोठी आर्थिक गुंतवणूक असलेला असून त्याची उभारणी अत्यंत चिंचोळ््या रस्त्यावर केली जात आहे. तो चालू करण्यापूर्वी आवश्यक असलेली जनतेची सुनावणी अत्यंत घाईघाईत उरकण्यात आली, याविषयी जनतेमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न आणि मागण्या काय आहेत याची दखल घेतली गेली नाही व जनतेला आपले गाºहाणे मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आली नसल्याचा आरोप प्रतिष्ठानने यावेळी केला. या प्रकल्पाच्या एमएमआरडीएने प्रसिद्ध केलेल्या डीपीआरमध्ये त्याचे उद्दिष्ट काय आहे हे स्पष्ट करताना फक्त कमी होणारा खर्च व वेगात अंमलबजावणी हे दोनच निकष दिलेले आहेत. पण यात व्यापक नियोजन, भू संपादनाची किंमत विचारात न घेणे, पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची किंमत गृहीत न धरणे, वाहतुकीचे व संपर्काचे अन्य प्रश्न दुर्लक्षिले गेले आहेत. याबरोबर वाहतूक विभागानेही कापूरबावडी येथील कामामुळे होत असलेल्या प्रचंड वाहतूककोंडीवर उपाय शोधेस्तोवर मेट्रो-४ चे काम सहा महिने पुढे ढकलावे, अशा आशयाचे पत्र एमएमआरडीए दिले आहे.