• MyPassion
ठाणे पोलिसांकडून थकीत असलेली थकबाकी ठाणे परिवहन सेवेला सुपूर्त .
09 Jul, 2019

ठाणे पोलिसांकडून थकीत असलेली २३ कोटींची थकबाकी अखेर ठाणे परिवहन सेवेला मिळाली असून यामुळे आता परिवहन सेवेच्या कर्मचा-यांची थकीत देणी देण्याचा मार्ग काही प्रमाणात सुटला आहे. मात्र या निधीचे वाटप कशा पद्धतीने करायचे यासंदर्भात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे परिवहनच्या व्यवस्थापकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ठाणे परिवहन सेवेतील कर्मचार्यांची विविध भत्यापोटी ३९ कोटी रुपयांची थकबाकी देणे बाकी आहे. मागील कित्येक वर्षांपासून यासाठी विविध प्रकारे आंदोलने केली जात आहेत. परंतु परिवहन सेवेकडे निधीच नसल्याने ही मागणी गेली कित्येक वर्ष खितपत पडली होती. त्यावर ठोस असा निर्णय घेतला जात नव्हता. परंतु नुकतेच ठाणे परिवहन सेवेला पोलीस विभागाकडून प्रतिपूर्ती प्रलंबित २३ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. ही वसुली करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आयुक्त संजीव जयस्वाल परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे ही रक्कम वसूल झाली. याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव परिवहन समिती सदस्य राजेंद्र महाडिक यांनी सोमवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत मांडला. त्याला संजय भोसले यांनी अनुमोदन दिले. यावेळी प्रशासनाच्या वतीने बोलताना परिवहन व्यवस्थापक संदिप माळवी यांनी हे २३ कोटी रुपये कर्मचार्यांची जी ३९ कोटींची थकबाकी आहे, त्यासाठी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.