• MyPassion
ठाणे महापालिकेमार्फत सुरु होणार दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी शाळा . 
06 Jan, 2020

ठाणे महापालिकेच्या विविध प्राथमिक शाळांत शिक्षण घेत असलेल्या ३४ दृष्टिहीन विद्यार्थ्यांना एका छताखाली आणून त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरी येथील महापालिका शाळा क्रमांक ९ मधील चार वर्गखोल्यांमध्ये ही शाळा सुरू करण्यात येणार असून याच ठिकाणी त्यांना ब्रेल ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून ही शाळा सुरू होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.ठाणे महापालिकेमार्फत शहरामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळा चालविण्यात येतात. या शाळांमध्ये इतर विद्यार्थ्यांसोबतच ३४ दृष्टिहीन विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, इतर विद्यार्थ्यांसोबतच दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच या विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळा सुरू   करण्याचा निर्णय घेतला होता. या विद्यार्थ्यांचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण मिळावे आणि त्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशातून त्यांनी हा निर्णय घेतला होता. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. त्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर शाळा उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. या शाळेच्या कामासाठी २८ लाख ३२ हजार ३४९ रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे.