• MyPassion
ठाणे पालिकेकडून राबवली जाणारी श्वान निर्बीजीकरण प्रक्रिया वर्षभरापासूनबंद .
20 Dec, 2019

ठाणे महापालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबवली जाणारी श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया प्रक्रिया वर्षभरापासून बंद आहे. हे काम करणाऱ्या संस्थेच्या ठेक्याची मुदत संपल्यानंतर मुदतवाढ करण्याकडे किंवा नव्या संस्थेची नेमणूक करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. ठाणे महापालिका आरोग्य विभाग खासगी संस्थेच्या माध्यमातून शहरातील भटक्या श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करतो. संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये २००४ ते आतापर्यंत ५८ हजार ५३७ भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले असून त्यासाठी ८ कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर या कामासाठी पुन्हा नव्याने दीड कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ऑगस्ट महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र, निर्बीजीकरण शस्त्रक्रियेवर आक्षेप घेत नगरसेवकांनी हा प्रस्ताव मंजूर केला नव्हता. असे असतानाच शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ भोईर यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळेस संबंधित संस्थेचा ठेका संपला असल्यामुळे गेल्या वर्षभरापासून ही शस्त्रक्रिया बंद असल्याची माहिती प्रशासनाने दिली. ठेका बंद झाला असला तरी ठेकेदाराला  पालिकेकडून पैसे दिले जात असल्याचा आरोप नगरसेवक एकनाथ भोईर यांनी केला. मात्र, हा आरोप प्रशासनाने फेटाळून लावला. निर्बीजीकरण शस्त्रक्रियेच्या प्रस्तावाला यापूर्वी २६ डिसेंबर २०१६ रोजी स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली होती. तीन वर्षांसाठी ही निविदा मागविण्यात आली होती. मात्र ऑगस्ट २०१८ मध्ये या कामाची मुदत संपली. काही तांत्रिक कारणांस्तव या कामाला निधी मिळू शकला नाही. त्यामुळेच या ठेक्याला मुदत वाढ देण्यात आली नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली.