• MyPassion
ठाणे पालिकेच्या महत्वाच्या प्रकल्पांचे पोलिस आयुक्त तसच महापालिका आयुक्तांसमोर झाले सादरीकरण.
03 Oct, 2019

ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासमोर काल महापालिकेच्या खाडी किनारा विकास प्रकल्प, महामेट्रो, अंतर्गत मेट्रो, सॅटीस पूर्व, नवीन रल्वे स्टेशन, कळवा ब्रीज, नागरी समुह विकास योजना, नवीन ठाणे आणि कंमाड अँड कंट्रोल सेंटर या प्रकल्पांसह अनेक प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. या सर्व प्रकल्पांचे सादरीकरण पाहिल्यानंतर पोलिस आयुक्त श्री. फणसळकर यांनी महापालिकेचे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांचे कौतुक करून पालिकेस संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. काल सकाळी ११.३० वाजता महापालिका भवनामध्ये या बैठकीस सुरूवात झाली. यावेळी सुरूवातीस महामेट्रोचे सादरीकरण करण्यात आले. श्री. फणसळकर यांनी महामेट्रोची मार्गिका आणि अंतर्गत मेट्रोची मार्गिका यांची माहिती घेतली व त्यानुषंगाने वाहतूक कोंडी कुठे होवू शकेल आणि त्यावर काय उपाययोजना करता येईल यासंबंधी तपशीलवार चर्चा केली. त्याचबरोबर ठाणे स्टेशन परिसर सुधारणा प्रकल्प पूर्व या प्रकल्पाचीही माहिती घेतली व या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात केल्यानंतर निर्माण होणारी वाहतूक कोंडी कशी सोडविता येईल याविषयी चर्चा केली. यावेळी श्री. फणसळकर यांनी नागरी समुह विकास योजनेविषयी माहिती घेतली. प्रकल्पाची आखणी आणि तयार करण्यात आलेले आराखडे त्यांनी पाहिले. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी कशी होईल याची तपशीलवार विवेचन केल्यानंतर  श्री. फणसळकर यांनी या प्रकल्पामुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यास मदत होईल असा आशावाद व्यक्त केला तसेच महापालिकेच्या अधिका-यांनी या प्रकल्पासाठी केलेल्या मेहनतीचे कौतुक केले. यावेळी त्यांनी कंमाड अँड कंट्रोल सेटंर या प्रकल्पांची माहिती घेवून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. जवळपास चार तास चाललेल्या या बैठकीमध्ये नवीन ठाणे स्टेशन त्याचे आराखडे, खारेगाव आणि दिवा पादचारू पूल, कळवा ब्रीज, नवीन ठाणे शहर, घोडबंदर रोड बायपास, तीन हात नाका येथील ग्रेड सेपरेटर, पीआरटीएस आदी प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. या सर्व प्रकल्पांची माहिती श्री. फणसळकर यांनी समजून घेतली. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दुरदृष्टीचे त्यांनी कौतुक केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त(१) राजेंद्र अहिवर, अतिरिक्त आयुक्त(२) समीर उन्हाळे, वाहतूक शाखा पोलिस उपायुक्त अमित काळे, पोलिस उपायुक्त श्री. बुरसे, महामेट्रोचे अधिकारी, विविध प्रकल्पांचे सल्लागार आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.