• MyPassion
ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला कर्तव्याची जाणीव उशिरा झाल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त.
11 Jul, 2019

पावसाळ्यापूर्वीचे नियोजन केवळ बैठकांसह कागदावर करणाऱ्या महापालिका आरोग्य विभागाला प्रत्यक्ष कारवाईचा विसर पडला असून नागरिकांना फटका बसल्यानंतर तपासणी करण्याची जाग प्रशासनाला आली आहे. वर्तकनगर पोलिस स्थानकासमोरील पायोनियर सोसाटीत राहणाऱ्या श्रेया यादव या विद्यार्थिनीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना उघड झाल्यानंतर सोसायटीत फवारणीसह घराघरांमध्ये जाऊन पाहणी करण्याचा बेत महापालिकेने आखला असला तरी कर्तव्याची जाणीव पालिकेला उशिराने झाल्याबाबत रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी केले जाणारे नियोजन पूर्ण झाले असून त्याबाबत संबंधित यंत्रणाही सज्ज असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे यापूर्वी देण्यात आली होती. मुळातच उशिरा हजेरी लावलेल्या पावसाने मागील आठवड्यापासून झोडपण्यास सुरुवात केली असताना आता साथीच्या आजारांची दहशत ठाणेकरांच्या मनात निर्माण झाली आहे. वर्तकनगर पोलिस स्थानकासमोरील पायोनियर सोसायटीत राहणाऱ्या श्रेया यादव या तेरा वर्षीय मुलीचा डेंग्यूने बळी घेतला, याबाबत अनभिज्ञ असलेल्या आरोग्ययंत्रणेच्या नियोजनाचे दावेही फोल ठरले. पावसाळयापूर्वी केल्या जाणाऱ्या कामांच्या बाता करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती केली असती तर साथीच्या आजारांचा धोका काही प्रमाणात टाळता आला असता, असा संताप ठाणेकरांकडून व्यक्त केला जात आहे. पायोनिअर सोसायटीत मागील अनेक दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत सोसायटीतील सदस्यांनी वारंवार नाराजी व्यक्त केली असून सोसायटीतील मीटिंगमध्येही याबाबत चर्चा करण्यात आली. महापालिकेलाही याची सूचना देण्यात आल्याचे सोसायटीतील सदस्यांनी सांगितले. यासह सोसायटीच्या मागील भागात भलामोठा नाला असून ऐन पावसाळ्याच्या मुहूर्तावर नाल्याच्या कल्व्हर्टचे काम कंत्राटदाराने सुरू केले. वास्तविक हे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच होणे अपेक्षित होते. पावसाळ्यात सुरू केलेल्या या कामामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे साथीच्या आजारांना प्रोत्साहन मिळाले. याबाबाबत आरोग्य यंत्रणेने कोणतीही कारवाई केली नसताना श्रेया हिचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर प्रशासनाला जाग आली. पायोनियर सोसायटीत फवारणी प्रक्रिया केली गेली असून तेथील कचरा, पाणी यांची माहितीही पालिका कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली. त्याचप्रमाणे आरोग्ययंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी घराघरांना भेटी देत आजारांविषयी चौकशीसत्र सुरू केले. आरोग्ययंत्रणेला यापूर्वीच जाग आली असती तर परिसरातील अस्वच्छता आणि त्यामुळे फोफावणारा डेंग्यू यांची योग्य वेळेत नोंद झाली असती. मात्र दुर्घटना घडल्यानंतरचं त्यावर महापालिकेकडून उपाय केले जातात, ही खेदजनक बाब असल्याची प्रतिक्रिया सोसायटीतील सदस्यांकडून व्यक्त केली जात आहे.