• MyPassion
ठाणे महापालिका करणार ठाण्यातील रस्ते भंगारमुक्त.
12 Jun, 2019

ठाण्यातील रस्त्या च्या दुतर्फा असणाऱ्या बेवासर वाहनांवर सद्या महापालिका आणि वाहतूक विभागाच्या वतीने जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या निदर्शनास बेवारस वाहन आल्या तर त्वरित वाहतूक विभाग आणि महापालिकेला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता ठाण्यातील रस्ते "भंगारमुक्त" करण्याचा मानस वाहतूक विभाग आणि महापालिकेने हाती घेतला आहे. तुमच्या घराशेजारी कित्येक वर्षांपासून रिक्षा, कार, दुचाकी धूळखात पडलेल्या असतात. मात्र त्याकडे लक्ष देण्यास ना पालिकेला वेळ असतो, ना वाहतूक शाखेला सवड. या समस्येवर मात करण्यासाठी ठाणे पालिकेसोबत वाहतूक शाखेने कंबर कसली आहे. भंगार गाड्यांचा पत्ता देताच या दोन्ही यंत्रणांचे संयुक्त पथक घटनास्थळी दाखल होऊन या 'खटारा' गाड्या उचलून नेणार आहेत. त्यामुळे खटारामुक्त परिसर मोकळा होण्यास मदत होणार आहे. स्मार्ट सिटीची स्वप्नं रंगवणाऱ्या ठाणे शहरातील रस्ते रुंद होत असले तरीही येथील पदपथ, मोकळ्या जागा, रस्त्यांच्या कडेला अथवा मैदानात धूळखात पडलेल्या चारचाकी गाड्यांचे खटारे पडलेले असतात. कोणीही वाली नसलेल्या या गाड्यांमुळे शहराच्या सौंदर्याला बट्टा लागतोच. मात्र अशा उघड्या बोडक्या गाड्यांमध्ये अडकून लहानग्यांचे मृत्यू झाल्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत. गाड्यांचे सुट्टे पार्टस काढून विकणाऱ्या भुरट्या चोरांचीही त्यामुळे चांदी होते. असे प्रकार रोखण्यासाठी पालिकेने वाहतूक शाखेसोबत भंगार गाड्या उचलण्याची मोहीम सुरु केली आहे. गेल्या १५ दिवसात या पथकाने ६० हुन अधिक भंगार रिक्षा, गाड्या व दुचाकी उचलून पालिकेच्या लोढा येथील मैदानावर नेऊन ठेवल्या आहेत. तर दोनच दिवसांपूर्वी वागळे इस्टेट व वर्तकनगर भागातील ३२ गाड्या क्रेनने उचलून नेल्याची माहिती वागळे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली.