• MyPassion
ठाणे महापालिका राबवणार होर्डिंग्स ,पदपथ आणि पर्यटनासाठी विशेष धोरण . 
06 Jan, 2020

यापुढे ठाणे शहरामध्ये किती क्षेत्रामध्ये होर्डिंग लावता येईल, कोणत्या आकाराचे लावता येईल तसेच होर्डिंगमुळे नागरिकांच्यादृष्टीस अडथळा येवू नये आणि शहर सौंदर्यात बाधा येवू नये यासाठी नवीन जाहिरातफलक धोरण, नागरिकांसाठी नीटनेटके फुटपाथ करणे आणि ठाणे शहराचे पर्यटन मुल्य वाढावे यासाठी विशेष धोरण तयार करण्यासाठी तीन विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्याबरोबरच एका आठवड्यात या समित्यांनी धोरणाचा मसुदा सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.ठाणे महानगरपालिकेच्यावतीने 2003 च्या शासन जाहिरात धोरणानुसार जाहिरातफलक उभारणीस परवानगी देण्यात येते. यापुढे जाहिरातफलक लावण्यासाठी परवानगी देताना शहराच्या सौंदर्यास बाधा येणार नाही अशा पद्धतीने परवानगी देणे, किती क्षेत्रफळामध्ये आणि किती आकाराचे होर्डींग उभा करता येईल, किती अंतरावर परवानगी देता येईल याबरोबरच न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणे, नागरिकांच्या दृष्टीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे असे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येणार आहे. यासाठी उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, कार्यकारी अभियंता शहर विकास श्री. भेंडाळे यांची समिती नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर शहराचे पर्यटन मुल्य वाढावे आणि मुंबई आणि परिसरातील पर्यंटकांनी भेट द्यावी यासाठी काय करता येईल याचा अहवाल तयार करण्याचे आदेश देताना शहरामध्ये होणारे सांस्कृतिक तसेच विविध कला महोत्सव, महत्वाची ठिकाणे, पार्क आदींबाबत नागरिकांना सहज माहिती मिळावी यासाठी काय करता येईल याचा मसुदा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये उप आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता रविंद्र खडताळे आणि कार्यकारी अभियंता मोहन कलाल या अधिका-यांचा समावेश आहे.दरम्यान शहरातील नागरिकांच्यादृष्टीने सुलभ फुटपाथ बनविण्यासाठी आवश्यक धोरण तयार करण्यासाठी अति. नगर अभियंता अर्जून अहिरे या अधिपत्त्याखाली रामदास शिंदे आणि विकास ढोले यांची समिती नियुक्त केली आहे. या तीनही समित्यांनी एका आठवड्यात त्यांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी महापालिका आयुक्तांनी दिल्या.