• MyPassion
ठाणे जॉईंट अन मोशन आयोजित शेठ अर्ध मॅरेथॉन स्पर्धा संपन्न .
10 Jun, 2019

ठाणे जॉईंट अन मोशन आयोजित शेठ अर्ध मॅरेथॉन स्पर्धेतील पुरुषांच्या ३६ ते ५० वर्ष वयोगटात राकेश पटेलने ८ मिनिटाच्या फरकाने सुनीलला मागे टाकत २१ किमी अंतराच्या शर्यतीत बाजी मारली. याच वयोगटातील महिलांच्या २१ किलोमीटर शर्यतीत सयुरी दळवी विजेती ठरली. अश्विन शेठ ग्रुपने पुरस्कृत केलेल्या या शर्यतीच्या सुरुवातीला आभाळ भरून आलेले होते. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. पण वरुण राजाने हजेरी लावलीच नाही, अशा परिस्थितीत वाढलेल्या उष्म्याचा परिणाम धावपटूंच्या कामगिरीवर झाल्याचे पहायला मिळाले. विवियाना मॉलपासून सुरु झालेल्या या शर्यतीमध्ये मध्यम वयोगटातील धावपटूंनी चांगली वेळ नोंदवली. पुरुषांच्या ३६ ते ५० वयोगटातील विजेत्या राकेशने २१ किमीचे अंतर पूर्ण करण्यासाठी १:२७:०८ मिनिटे एवढा वेळ घेतला. तर दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या सुनीलने १;३५;१६ मध्ये अंतिम रेषा पार केली. इर्विन कार्डोसा १; ५२ ;०० अशा वेळेसह तिसऱ्या क्रमांकाचा विजेता ठरला. महिलांच्या गटात सयुरी आणि श्वेता सोरेल या अनुभवी धावपटूमध्ये चांगली चुरस पहायला मिळाली. पण शर्यतीच्या अंतिम टप्प्यात सयुरीने आघाडी घेत १;५३; ०५ अशी वेळ नोंदवत विजेतेपदावर आपल्या नावाची मोहर उमटवली. श्वेताने १;५८;०२ मिनिटे अशी वेळ नोंदवून आपले दुसरे स्थान निश्चित केले. या गटात अनामिका मिश्रा तिसऱ्या क्रमांकाची विजेती ठरली यावेळी दिव्यांगांसाठी २ किमी अंतराची विशेष व्हीलचेअर दौड आयोजित करण्यात आली होती. या व्हीलचेअर दौडमध्ये ५० हुन अधिक दिव्यांग सहभागी झाले होते. सुमारे दोन हजाराहून अधिक धावपटूचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी मदतनिधी गोळा करण्यात आला असून हा निधी शासनाने प्रारित केलेल्या संकेतस्थळाच्या द्वारे जमा केला जाणार असल्याचे या स्पर्धेचे प्रमुख संयोजक डॉ सुदर्शन सिंग यांनी सांगितले.