• MyPassion
ठाणे जिल्ह्यात तीन नव्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद.
09 Jul, 2019

पावसाळ्यात हवेत जाणविणाऱ्या गारव्यामुळे एच १ एन १ चे विषाणू पुन्हा सक्रीय झाले असून स्वाइनचा धोका कायम असल्याचे चित्र दिसून आले आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात तीन नव्या रुग्णांची नोंद घेण्यात आली असून हे तिन्ही रुग्ण ठाणे शहरातील आहेत. मागील सहा महिन्यांत १८३ रुग्णांना स्वाइनबाधा झाल्याने येत्या काळात स्वाइन फ्लूबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला डॉक्टरांतर्फे दिला जात आहे. उशिरा हजेरी लावलेल्या पावसाने जोरदार बरसात सुरू केली आहे. त्यामुो हवेत गारवा निर्माण झाला असला तरी या वातावरणातील बदलांमुळे स्वाइन फ्लूचा धोका अधिक वाढल्याचे डॉक्टरांतर्फे सांगण्यात येत आहे. जुलै महिन्याच्या पहिला आठवड्यातच जिल्ह्यात तीन स्वाइन बाधितांची नोंद झाली असून हे तिन्ही रुग्ण ठाणे शहरातील आहेत. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात १८३ रुग्णांना स्वाइनची बाधा झाली होती. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे ठाणे शहरातील होते. आतापर्यंत ठाण्यात तब्बल ९६ रुग्णांची नोंद घेण्यात आली असून पावसाळ्यातही याच शहरात स्वाइनचा धोका असल्याचे दिसून आले. त्यापाठोपाठ आतापर्यंत भाईंदरमध्ये ३८, कल्याणमध्ये ३१, तर नवी मुंबईमध्ये १६ रुग्णांची नोंद घेण्यात आली होती. या रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. मात्र जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत सात जणांचा स्वाइनने बळी घेतल्याचीही बाब समोर आली आहे. गेल्या महिन्यात तीन रुग्णांची नोंद घेण्यात आली असतानाच यंदा महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एका शहरात तीन रुग्ण आढळल्याने सावधानतेचा इशारा डॉक्टरांतर्फे देण्यात आला आहे.