• MyPassion
टीडीआरएफच्या जवानांना देण्यात आले पूरपरिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण .
14 Jun, 2019

आपत्तीजन्य परिस्थितीत सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या टीडीआरएफच्या ४० जवानांच्या टीमला प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष व अग्निशमन विभागाच्यावतीने मासुंदा तलाव येथे मान्सून कालावधीत पूरजन्य परिस्थितीत बोट चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या निर्देशानुसार आपत्कालीन परिस्थितीत कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या धर्तीवर टीडीआरएफची निर्मिती करण्यात आली आहे. या दलामध्ये सध्यस्थितीत ४० जवान, १ उपकमांडंट कार्यरत आहेत.सदरची टीम सक्षम करण्यासाठी तसेच आपत्तीकालीन परिस्थितीत प्रभावीपणे मदतकार्य करता यावे यासाठी त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या सर्व जवानांना ठाणे महापालिकेच्यावतीने अद्यवात प्रशिक्षण देण्यात येत असून गेले दोन दिवस मासुंदा तलाव येथे पूरजन्य परिस्थितीत बोट चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच इमारत कोसळल्यानंतर शोध,सुटका व प्रथमोपचार यांचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर या दलातील जवान तीन पाळ्यांमध्ये महापालिका क्षेत्रात २४ तास कार्यरत राहणार आहेत.