• MyPassion
शालेय साहित्याचा पुरवठा न करता बँकखात्यात रक्कम जमा करण्याचा पालिकेचा निर्णय .
10 May, 2019

ठाणे महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य वाटप प्रक्रियेत गैरव्यवहार होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा पुरवठा न करता त्यांच्या बँकखात्यावर ठरावीक रक्कम वळती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. परंतु, विद्यार्थ्यांना अजूनही ठरावीक व्यापाऱ्यांकडूनच शालेय साहित्य खरेदी करण्याचा आग्रह केला जात असल्याचा आरोप ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. ठाणे महापालिकेच्या १३५ शाळांमध्ये ३३ हजार ५४१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना महापालिकेतर्फे गणवेश, बूट, दप्तर, वह्य़ा असे शैक्षणिक साहित्य देणे बंधनकारक आहे. यापूर्वी हे साहित्य निविदा काढून विविध कंत्राटदारामार्फत विद्यार्थ्यांना दिले जात होते. या व्यवहारात अनेक आक्षेप घेतले जात होते आणि साहित्य निकृष्ट असल्याचा आरोप केला जात असे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने थेट बँक हस्तांतर (डीबीटी) योजना राबविण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनाला दिले आहेत. या योजनेनुसार पालिका शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ठरावीक रक्कम जमा करते व विद्यार्थी-पालक आपल्या पसंतीनुसार शालेय साहित्य खरेदी करतात. या योजनेमुळे शालेय साहित्य वाटप प्रक्रियेतील गैरव्यवहाराची शक्यता कमी होण्याचा अंदाज होता. परंतु, नव्या योजनेतही ठरावीक व्यापाऱ्यांकडूनच शालेय साहित्य खरेदी करण्याचा आग्रह धरला जात असल्याचा आरोप ठाणे मतदाता जागरण अभियनाचे पदाधिकारी संजीव साने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. विद्यार्थ्यांना आजही शाळेत व्यापाऱ्यांमार्फत शालेय साहित्य आणून दिले जात असून त्यानंतर विद्यार्थी शाळेत पैसे जमा करतात आणि ते पैसे शाळा व्यापाऱ्याला देते. काही वेळेस विविध व्यापाऱ्यांच्या खात्यावर बँकेमार्फत पैसे दिले जातात. त्यासाठी बँकेला पत्रही दिला जात आहे. हे साहित्य निकृष्ठ दर्जाचे असून त्यासाठी लावलेल्या किमती उत्तम दर्जाच्या साहित्याइतक्या आहेत. त्यामुळे या प्रक्रियेत चार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे, असा आरोपही संजीव साने यांनी केला.