• MyPassion
संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी माध्यमांची भूमिका महत्वाची . 
07 Jan, 2020

कुटुंब संस्था अधिक सक्षम आणि संस्कारक्षम बनविणे समाज हिताचे असून समाज स्वास्थासाठी महिला आणि मुलींविषयी समाजाची असलेली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी संपूर्ण समाजाबरोबरच माध्यमांची भूमिका सर्वार्थाने महत्वाची असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते ओनील कुलकर्णी यांनी केले.नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महापालिका मुख्यालय येथे जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका जनसंपर्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून महिला सुरक्षा विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोरे, जिल्हा पत्रकार संघाचे संजय पितळे उपायुक्त संदीप माळवी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना श्री कुलकर्णी म्हणाले महिला या असुरक्षित नसून त्या सुरक्षित आहेत ही भावना आणि मानसिकता समाजात निर्माण होण्यासाठी प्रसार माध्यमांची भूमिका गरजेची आहे. महिला सुरक्षा आणि सबलीकरणासाठी समाजातील सर्वच घटकांबरोबरच पालक, कुटुंब, माध्यमे, शिक्षण संस्था यांचा सक्रीय सहभाग महत्वाचा आहे. महिला सुशिक्षित झाल्यामुळे त्या आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाल्या आहेत. परंतु त्यांना सुरक्षितता मिळाली नाही. कायदे आपल्या बाजूला आहेत, असे महिलांना वाटले पाहिजेत. महिलांच्या सुरक्षिततेची काळजी सर्वजण घेतात. काळजी बरोबरच मानसिकता बदलून तिला भावनिक संरक्षण देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांनी केले.पत्रकार दिनानिर्मित्त विभागीय उपसंचालक माहिती डॉ. गणेश मुळे यांच्या शुभेच्छा पत्राचे वाचन करण्यात आले.उपआयुक्त संदिप माळवी यांनी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्ह्यातील पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.