• MyPassion
'रेझिंग डे' निमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयात विविध उपक्रमांचे आयोजन.
02 Jan, 2020

तुमच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली तर ती किती लांब जाते? एखाद्याला ती लागली तर तो मरतो का? तुम्ही कधी फायरिंग केले आहे का?... असे एकापेक्षा एक अचंबित करणारे आणि काही क्षण चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारे प्रश्न विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी ठाण्यातील पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना विचारली. अर्थात, तेवढ्याच मनमोकळेपणाने या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. पोलीस प्रसंगी सामान्य नागरिकांना कशी मदत करतात आणि गुन्हेगारांचे कसे कर्दनकाळ होतात, हे पटवून आपल्या शस्त्रास्त्रांचीही विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त अर्थात 'रेझिंग डे' निमित्त २ ते ८ जानेवारीदरम्यान ठाणे पोलीस आयुक्तालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ जानेवारी रोजी पहिल्याच दिवशी ठाण्यातील नौपाडा आणि ठाणेनगर या दोन पोलीस ठाण्यांना शालेय विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. यादरम्यान, विद्यार्थ्यांनी पोलिसांबद्दल आणि त्यांच्याकडील शस्त्रास्त्रांची माहिती कुतूहलाने जाणून घेतली. यावेळी पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाज कसे चालते? याशिवाय, कोणकोणती शस्त्रे पोलिसांना वेळप्रसंगी हाताळावी लागतात? याची थोडक्यात माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकयांनी दिली. नाइन एमएम, कार्बाइन, एसएलआर आणि गॅसगन अशा वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांमध्ये किती काडतसे असतात. ती किती लांब पल्ल्यापर्यंत आपले लक्ष्य साधू शकतात, याचीही विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. याशिवाय, फायरिंग बटच्या ठिकाणी नियमित सरावही करताना ते आपल्याला हाताळावे लागते. असे कार्बाइनकडे नजर टाकत मुलांना त्यांनी स्पष्टीकरण दिल्यावर त्यांचे समाधान झाले. पण मुळात, कोणत्याही प्रसंगी लगेच आपण रिव्हॉल्व्हरला हात लावत नाही, आधी वेगवेगळ्या प्रकारे इशारा दिला जातो. त्यानंतर, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जातात. तरीही, कोणी पोलिसांवर चाल केली तरच नाइलाजाने या शस्त्रास्त्रांचा पोलिसांना वापर करावा लागतो. मुले लक्ष देऊन पोलीचांचे म्हणणे ऐकत होती. तुम्ही चांगला अभ्यास करा, भविष्यात मोठे अधिकारी व्हा, असा सल्लाही त्यांनी मुलांच्या पाठीवर हात फिरवत दिला.