• MyPassion
रिक्षाचालकांच्या मनमानीस लगाम घालण्यासाठी ठाणे पोलीस पुन्हा एकदा सज्ज .
14 Dec, 2019

ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षाचालकांच्या मनमानीस लगाम घालण्यासाठी सॅटिस पुलाखालील नव्या पोलिस चौकीस पुन्हा स्थान देण्यात आले आहे. महापालिकेकडून कंटेनर उपलब्ध करून देण्यात आला असून या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून देखरेख ठेवली जाणार आहे. ही वाहतूक चौकी गेल्या सहा ते सात महिन्यांपूर्वी तेथून हटवण्यात आली होती. परंतु त्यामुळे या भागातील बेशिस्त पार्किंग, मनमानी वाहतूक वाढली होती. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी नव्याने ही चौकी सक्रिय होणार आहे. सॅटीस खालील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्षही सुरू करण्यात येणार आहे. ठाणे स्टेशन परिसरातील बेशिस्तपणा गेल्या काही महिन्यांपासून वाढला आहे. रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे प्रयोगही या बेशिस्त कारभारामुळे अपयशी ठरत आहेत. त्यामुळे या बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु या भागातील पोलिस चौकी स्थलांतरित केल्यामुळे हा परिसर रिक्षाचालकांच्या मनमानीपणामुळे कोंडीत सापडू लागला होता. या प्रकरणी खासदार राजन विचारे यांनी महापालिका अधिकारी आणि वाहतूक पोलिसांना गेल्या महिन्यात सूचना दिल्या होत्या.