• MyPassion
रिक्षा चालक काढणार विधानभवनावर मोर्चा.
10 Jun, 2019

राज्य शासनाने मुक्त केलेल्या ऑटोरिक्षा टॅक्सी परवान्यांना तातडीने स्थगिती द्यावी, रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ करावी, ऑटोरिक्षा कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी या प्रमुख मागण्यांसह कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने 18 जून रोजी बंदची हाक दिली आहे. या दिवशी आरटीओमध्ये रिक्षा जमा करुन विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिह्यांत असलेल्या विविध सर्वपक्षीय रिक्षा टॅक्सी युनियनचा कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ आहे.या महासंघाचा मेळावा आज ठाण्यातील शिवाईनगर येथील मंत्रांजली येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला पाचही जिह्यांतून रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश पेणकर यांनी आंदोलनाची रुपरेषा सांगितली. यावेळी महासंघाचे प्रमुख सललगार सुधाकर चव्हाण उपस्थित होते. शासन आणि परिवहन प्रशासनाने ऑटोरिक्षा टॅक्सी परवाने मुक्त केल्याने रिक्षा टॅक्सींच्या संख्येत पाचही जिल्ह्यांत भरमसाठ वाढ झाली आहे. शासनाला महसुल मिळावा म्हणून अमर्याद रिक्षा टॅक्सी परवान्यांचे वाटप केले आहे. मात्र आता सर्व ठिकाणी सार्वजनिक वाहतूककोंडी झाली आहे. बेरोजगारांना उपजिवीकेचे साधन म्हणून परवाने मुक्त केले पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात स्वत:चा व्यवसाय असलेले, नोकरदार यांनीही गरज नसताना जोडधंदा म्हणून रिक्षा टॅक्सी परवाने घेतले आहेत. मुक्त परवाना धोरणामुळे व्यवसायात जिवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने मुक्त परवाना धोरण बंद करुन परावाने वाटपाला 15 वर्षे स्थगिती द्यावी अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे प्रकाश पेणकर यांनी सांगितले. महासंघ गेली पाच वर्षे रिक्षा टॅक्सी भाडेवाढ करावी अशी मागणी करत आहे. मात्र अद्याप कोणतीही भाडेवाढ देण्यात आलेली नाही. रिक्षाचे आता असलेले किमान भाडे 18 रुपयांवरुन 22 रुपये आणि टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन किमान 30 रुपये करावे अशी आमची मागणी आहे. माथाडी कामगारांच्या धर्तीवर ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी, सिएनजी गॅस बाटला हायड्रो टेस्टींग वाढीव मनमानी 2550 रुपयांचे अन्यायकारक शुल्क रद्द करावे, अशा विविध मागण्यांसाठी आमचे हे आंदोलन असल्याचे प्रकाश पेणकर यांनी सांगितले.