• MyPassion
पावसाळ्यात साथीच्या आजार पसरू नयेत यासाठी आरोग्य विभाग सज्ज
08 Jun, 2019

वाढत्या तापमानामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात असली तरी पावसाळ्यात उद्भविणाऱ्या आजारांची भीतीही निर्माण होते. पावसाळ्यात भेडसावणाऱ्या साथीच्या आजारांचा विळखा पडू नये ठाणे महापालिका आरोग्य विभागाच्या तयारीला वेग आला असून शहरातील ३९ बांधकाम व्यावसायिक तसेच ८२ गॅरेजना याबाबत नोटीस पाठविण्यात आली आहे. मार्च महिन्यापासून तापलेल्या शहराला पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यभरात मान्सूनकडे लक्ष लागले असले तरी येणारा पावसाळा साथीच्या आजारांनाही सोबत घेऊन येतो. जून महिन्यापासून डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागते. शहरात साचलेले पाणी, उघड्यावरील अन्नपदार्थांची विक्री, ओल्या कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती यांसारख्या विविध कारणांमुळे वाढणाऱ्या साथीचे आजार फोफाविल्यानंतर आळा घालण्यापेक्षा त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मोहीम आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत आहे. याबाबत आरोग्य विभागातर्फे संबंधित वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये घरोघरी जाऊन तपासणी करण्यावर भर यंदा दिला जाणार आहे. पावसाळ्यातील मुख्य आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याने दूषित पाणीपुरवठा कोणत्या भागास होतो, याची माहिती घेत त्या भागात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून भेट दिली जाणार आहे. क्लोरिनच्या गोळ्यांचे वाटप असो वा संशयित रुग्णांची केली जाणारी तपासणी यांसारख्या उपक्रमांतून घरांपर्यंत हे उपचार पोहचविले जाणार आहे. पाण्याची साठवण करू नये अथवा साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये यासाठी महापालिकेतर्फे मराठी भाषेत २८ हजार २५० माहिती पत्रके छापण्यात आली आहे. यामध्ये भित्तीपत्रकांसहित फलकांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे हिंदी भाषेतही ६ हजार ६९० माहिती पत्रकांचे वाटप करण्यात येत आहे. शहरातील हिंदी भाषिक वस्त्यांसाठीही या भित्तीपत्रकांचा वापर केला जाणार आहे. शहरातील ७ हजार ५३४ इमारतींना याबाबत नोटीस पाठविण्यात आली असून गृहसंकुलातील आवारात कोणती दक्षता घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांनी सांगितले. बांधकाम व्यावसायिक तसेच गॅरेजधारक यांच्याकडे साठलेल्या पाण्याचा अधिक वापर होत असल्याने शहरातील २९ बांधकाम व्यावसायिकांना आतापर्यंत नोटीस पाठविण्यात आली आहे. तसेच ८२ गॅरेजना याबाबत लिखित स्वरूपातील नोटीस देण्यात आली असून पाणी न साठविण्याबाबत आदेश देण्यात आला आहे. पाण्याची केली जाणारी साठवण, त्यामुळे डेंग्यूचे डास, आळा यांची उत्पत्ती आढळल्यास साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारीही आरोग्य विभागातर्फे दाखविण्यात आली आहे