• MyPassion
पेपर बॉम्ब विकणारा ड्रग पेडलर अटकेत .
11 Jun, 2019

एक लहानसा कागदी स्टिकर जिभेवर ठेवताच नशेच्या गर्तेत धुंद होऊन तरंगत ठेवणार्या घातक पेपर बॉम्ब विकणार्या ड्रग पेडलरला अंमली पदार्थ विरोधी पथकाने कॅडबरी जंक्शन येथून अटक केली. त्याच्याकडून दहा पेपर बॉम्ब अर्थात एलएसडी पेपर पोलिसांनी हस्तगत केले आहेत. पिंक सुपर मॅन, ब्ल्यू-बॅटमॅन, ब्लॅक-स्पायडरमॅन अशा विविध कलर कोडवर्डने अंमली पदार्थांच्या बाजारात पेपर बॉम्ब कुप्रसिद्ध आहे. ब्राझील, ऑस्ट्रेलिया, युरोप या देशांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर काही वर्षांपूर्वी पेपर बॉम्ब भारतात आला. मात्र या ड्रगने आता ठाण्यातही हातपाय पसरण्यास सुरवात केल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वर्तकनगर येथील दोस्ती विहारमध्ये राहणार्या हितेश मल्होत्रा याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने कॅडबरी जंक्शन येथे सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे दहा एलएसडी पेपर सापडले असून त्याची किंमत 50 हजार रुपये किंमत आहे. त्याला 15 जूनपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. एलएसडी अंमली पदार्थाच्या बाजारात ड्रग्स पावडर, टॅबलेट आणि लिक्विड या प्रकारात उपलब्ध आहे. मात्र तरुणाईकडून या ड्रग्सच्या पेपर प्रकाराला जास्त मागणी असते. त्याचा तुकडा जिभेवर ठेवताच किक बसते. त्यामुळे ही नशा करणारी व्यक्ती अचाट करामती करू शकते, अशा धुंदीत राहते.