• MyPassion
पाकिस्तानचा आडमुठेपणा; कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश अमान्य.
13 May, 2017

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेतली आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला आदेश अमान्य केला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश अमान्य असल्याचे पाकिस्तानचे अॅटॉर्नी जनरल यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र हे आदेश मान्य नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. १५ मे रोजी नेदरलँडमधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्यालयात कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी होणार आहे. कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा व्हिएन्ना करारच्या विरोधात असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाला सांगितले आहे. कुलभूषण जाधव यांना ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी भारताने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीचे थेट प्रक्षेपण होणार आहे. संयुक्त राष्ट्राकडून अधिकृतपणे याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या वेब टीव्हीवरुन या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्राचे माहिती अधिकारी राजीव चंद्रन यांनी दिली आहे. १५ मे रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दीड वाजता आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण जाधव प्रकरणी सुनावणी होणार आहे.