• MyPassion
पहाटेच्या काकड आरती सह दत्त जन्माचा कार्यक्रम उत्साहात साजरा .
11 Dec, 2019

दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'आत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. अनेक भाविक दत्त जयंतीच्या दिवशी दिवसभर उपवास करतात. तसेच दत्त मंदिरात जाऊन दत्तात्रयाची पूजा करतात. हे व्रत केल्याने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात. दत्तात्रेयामध्ये 'गुरू' आणि 'देवता' या दोघांचाही मिलाफ असल्याने त्यांना 'गुरूदेव दत्त', असं म्हटलं जातं. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर या दत्तात्रयांचा जन्म झाला. म्हणूनच हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो.  दत्तजयंती निमित्त आज ठाणे शहरात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्राचीन समजल्या जाणाऱ्या चंदणी कोळीवाडा येथील कोळी समाज ट्रस्टच्या मंदिरात भाविकांनी -मोठ्या संख्येने गर्दी केली.दत्तजयंतीच्या निमित्ताने १००० ते १५०० भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले. मंदिरात दत्त याग यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ५ नवदाम्पत्यांनी भक्तिभावाने सहभाग घेतला. पहाटे मंदिरात काकड आरती आणि अभिषेक करण्यात आली. यानंतर दत्त जन्माचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात ठाणे आणि आसपासच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.