• MyPassion
नेहमीच टीकेचे धनी ठरत असलेल्या ठाणे महापालिकेने शहर खड्डेमुक्त करण्यासाठी उचलली ठोस पावले.  
06 Jan, 2020

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये पावसाळ्यात खड्डे पडून शहरातील वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी होत असून, यामुळे टीकेचे धनी ठरत असलेल्या महापालिका प्रशासनाने आता शहरातील ३७ चौक खड्डेमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील तीन हात नाक्यासह प्रमुख १२ चौकांचे मास्टीक अस्फाल्ट तर शहरातील २५ अंतर्गत चौकांचे यूटीडब्ल्यूटी पद्धतीने नूतनीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. ही कामे यंदाच्या वर्षांत पूर्ण केली जाणार असून खड्डय़ांमुळे होणाऱ्या कोंडीतून ठाणेकरांची काही प्रमाणात सुटका होण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले असून त्याचबरोबर शहरामध्ये वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाहनांच्या तुलनेत रस्ते अपुरे पडू लागल्याने महापालिका प्रशासनाकडून रस्ते रुंदीकरण मोहीम राबविली जात आहे. त्याचबरोबर विकास आराखडय़ातील रस्ते तयार करण्याची कामे प्रशासनाने हाती घेतली आहेत. तसेच शहर खड्डेमुक्त राहावे म्हणून सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केले जात आहेत. असे असले तरी दरवर्षी पावसाळ्यामध्ये शहरातील डांबरी रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये खड्डे पडत असल्याचे चित्र दिसून येते. या खड्डय़ांमुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी होते. त्याचा परिणाम शहरातील महामार्गासह अंतर्गत मार्गावरील वाहतुकीवर होतो. तसेच या खड्डय़ांमुळे महापालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका होते. ठाणे शहरातून मुंबई-नाशिक महामार्ग जात असून या महामार्गावरील तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी आणि माजिवाडा हे चौक आहेत. या चौकांना शहरातील अंतर्गत रस्ते जोडण्यात आलेले असून या चौकामध्ये वाहनांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ सुरू असते. वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या चौकामध्ये पावसाळ्यात खड्डे पडतात आणि त्याचा परिणाम महामार्गासह अंतर्गत मार्गावरील वाहतुकीवर होतो. त्याचप्रमाणे शहराच्या अंतर्गत भागातील चौकही वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असून या ठिकाणीही पावसाळ्यात खड्डे पडतात. त्यामुळे या सर्वच चौकांना खड्डेमुक्त करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असून १२ चौकांचे मास्टीक अस्फाल्ट पद्धतीने काम सुरू केले आहे. तर शहरातील २५ अंतर्गत चौकांचे यूटीडब्ल्यूटी पद्धतीने नूतनीकरण करण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.