• MyPassion
नवीन गृह निर्माणाच्या कामांबरोबरच क्लस्टर योजनेलाही गती देणार - गृह निर्माण मंत्री
19 Jul, 2019

ठाण्यात क्लस्टर योजनेला गती देण्यासाठी गृहनिर्माण विभागाशी संबंधित असलेल्या मुद्द्यांच्या संदर्भात पुढील आठवड्यात मंत्रालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाण्यात येऊन दिली आहे. विखे पाटील यांच्या या पुढाकारामुळे क्लस्टरच्या मुद्द्यावर ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेने आतापर्यंत जे श्रेय घेण्याचा प्रयन्त केला आहे त्याला काही अंशी धक्का लावण्याचे काम विखे पाटील यांच्या माध्यमातून भाजपने ठाण्यात केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये क्लस्टरच्या मुद्द्यावरून श्रेय वादाची लढाई तापण्याची चिन्हे आहेत .आज पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाल्यानंतर विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे . ठाणेकरांच्या सुरक्षित भवितव्यासाठी ठाण्यात क्लस्टर योजनेला मान्यता मिळाली आहे . त्यानुसार क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीचे काम देखील पालिका स्तरावर सुरु करण्यात आले आहे . ठाण्यात आतापर्यंत क्लस्टरच्या मुद्द्यावर सत्ताधारी शिवसेनेने नेहेमीच श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे . मात्र गुरुवारी अचानक दाखल झालेल्या गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्लस्टरच्या मुद्द्यावरून शिवसेनेची चांगलीच कोंडी केली आहे . ठाणे महापालिकेत विखे पाटील यांनी पालिका आयुक्त यांची भेट घेऊन त्यांनी म्हाडाच्या घरांसंदर्भात तसेच गृगनिर्माण विभागाशी असलेल्या क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात चर्चा केली . यावेळी क्लस्टर योजनेला कशा पद्धतीने गती देता येईल याविषयी त्यांनी संजीव जयस्वाल यांच्याशी चर्चा केली . ठाण्यात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माणची कामे सुरु असून त्यांना गती देण्यासोबत क्लस्टर योजनेला देखील गती देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले . विमा कंपन्यांच्या संदर्भात शिवसेनेने जी भूमिका घेतली आहे त्याचे देखील विखे पाटील यांनी स्वागत केले आहे . विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता . त्यामुळे कोणाचा तरी वाचक असणे आवश्यक असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले . सभागृहात ज्यावेळी आम्ही विरोधी बाकावर बसत होते त्यावेळी सरकारने अशाच प्रकारची कामे करावीत अशी आमची इच्छा होती . या सरकरकाला फार कमी कालावधी मिळाला असून मात्र या कमी कालावधीमध्ये झालेली कामे आणि मिळालेली मदत फार मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगून त्यांनी सरकारच्या कामाबाबद्दल समाधान व्यक्त केले आहे . नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष झालेल्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावावर मात्र त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे . चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस मुक्त होता होता भाजपच आता काँग्रेस युक्त झाला असल्याचे वक्तव्य केले होते . मात्र भाजपमध्ये येण्यास अनेक जण उत्सुक असल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्व चांगले असल्याने हे शक्य असल्याचे सांगून त्यांनी विषयाला बगल दिली .