• MyPassion
मृत झालेल्या रुग्णाची माहिती उशिराने दिल्याने खाजगी रुग्णालयाला बजावणार कारणे दाखवा नोटिस .
10 Jul, 2019

वर्तकनगर परिसरातील एका १३ वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली. पालिकेच्या आरोग्य विभागानेही त्या मुलीचा मृत्यू हा डेंग्यूनेच झाल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर या रुग्णाची माहिती उशिराने दिल्याने संबधित खाजगी रुग्णालयाला कारणे दाखवा नोटिस बजावणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तर ज्या भागात ती राहत होती, त्या भागातील आजूबाजूच्या पाच नव्याने उभ्या राहत असलेल्या इमारतींमध्येही डेंग्यूच्या अळ्या आढळल्या असून विकासकांनाही नोटिसा बजावल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर. टी. केंद्रे यांनी सांगितले. ठाणे येथील वर्तकनगर भागात १३ वर्षीय मुलगी राहत होती. तिचे वडील डॉक्टर आहेत. काही दिवसांपासून ती आजारी होती. ३ जुलै रोजी तिला ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ५ जुलै रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला डेंग्यूची लागण झाली होती आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. तिचा मृत्यू डेंग्युमुळेच झाल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी केंद्रे यांनी सांगितले. त्यानुसार तिच्या घरातील चार जणांची रक्ताची तपासणी केली आहे. त्यांच्या घरातील फ्लॉवर पॉटमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्याचेही त्यांनी सांगितले.खाजगी रुग्णालयांनी डेंग्यू किंवा इतर महत्त्वाच्या आजाराचा रुग्ण दाखल झाला असेल तर त्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, रुग्ण मृत पावल्यानंतरही त्याची माहिती खाजगी रुग्णालयाने न दिल्याने त्यांनाही कारणे दाखवा नोटिस बजावली असून माहिती उशिरा कळविण्यामागचे कारण त्यात विचारल्याचे त्यांनी सांगितले.