• MyPassion
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार पात्र  शेतक-यांना 
04 Jan, 2020

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतक-यांना मिळावा यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिका-यांच्या एका बैठकीत जिल्हाधिका-यांनी हे आदेश दिले. या योजनेनुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत अल्प मुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या शेतक-यांना कर्जमाफी लागू करण्यात आली आहे. कर्जमुक्ती योजनेमध्ये ज्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची रक्कम २ लाखांपेक्षा अधिक असेल अशी कर्ज खाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाहीत असं जिल्हाधिका-यांनी सांगितलं. कर्जमुक्तीचा लाभ देताना वैयक्तीक शेतकरी हा निकष गृहीत धरला जाणार आहे. अल्पमुदत पीक कर्ज आणि अल्पमुदत पीक कर्जांचे पुनर्गठीत वा फेर पुनर्गठीत कर्ज विचारात घेण्यात येईल असे निकष शासन निर्णयात देण्यात आले आहेत. राज्याचे आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार, केंद्र आणि राज्य शासनाचे सर्व अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि सहकारी दूधसंघाचे अधिकारी ज्यांचे वेतन २५ हजारापेक्षा अधिक आहे त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार नाही असंही जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केलं.