• MyPassion
महाराष्ट्रातील पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र चित्रशिल्प’चे अनावरण .
10 Jun, 2019

शिवरायांचे राज्य हे कल्याणकारी राज्य होते. आज जर हाच विचार आताच्या सत्ताधाऱ्यांनी अवलंबला असता, तर महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागला नसता. अजूनही तसे झाल्यास महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते तथा शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रविवारी ठाण्यात केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर पारसिक डोंगराच्या पायथ्याला साकारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र चित्रशिल्प’चे अनावरण डॉ. कोल्हे यांच्या हस्ते पार पडले . त्यावेळी ते बोलत होते. जगद्गुरू तुकाराम महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रांनी सजलेला महाराष्ट्र या शिल्पामध्ये दाखवण्यात आला आहे. रेतीबंदरमध्ये साडेतीन किलोमीटर लांबीच्या चौपाटीची निर्मिती करण्यात येत आहे. याचठिकाणी पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दाखवणाऱ्या चित्रशिल्पाची केदार घाटे यांनी निर्मिती केली आहे. त्याच्या अनावरणानंतर खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, हे चित्रशिल्प पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेचा संदेश प्रसारित करणारे आहे. आभूषणे आणि शस्त्रांशिवाय छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकारामांकडून स्वराज्य चालवण्याचे धडे घेत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपतींनी जे राज्य स्थापन केले, ते भोसल्यांचे नव्हते. अठरापगड जातींना सामावून घेऊन समता आणि समानतेचे स्वराज्य त्यांनी स्थापन केले होते. महात्मा फुलेंनी त्याच शिवाजी महाराजांची समाधी शोधून समतेच्या विचारांचा प्रचार केला होता. या शिल्पात दोन स्त्रियांना वरचे स्थान दिले आहे. महिलांच्या सबलीकरणाचा आदर्श साडेतीनशे वर्षांपूर्वी माँ जिजाऊंनीच दिला. सावित्रीबाईनी स्त्री शिक्षणाचा महायज्ञ पेटवला आहे. आज शिवाजी महाराज जन्माला यावेत, अशी अपेक्षा बाळगतो. पण, त्यासाठी आपल्या घरातील जिजाऊंचा सन्मान करण्याची गरज आहे. आव्हाड यांच्या वैचारिकतेला त्यांनी सलाम ठोकला. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेणारी शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारा या शिल्पाच्या माध्यमातून साकारली असल्याचे कौतुकोद्गारही त्यांनी काढले. दरम्यान, या चित्रशिल्पातून महाराष्ट्राची विचारधारा मांडण्याचा प्रयत्न केल्याचे आमदार आव्हाड यावेळी म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबाजी पाटील, नगरसेवक राजन किणे उपस्थित होते.