• MyPassion
महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाची महायुतीकडे जागांची मागणी .
15 Jun, 2019

शिवसेना भाजपा महायुती मधील घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील 10 जागा आम्हाला सोडाव्यात अशी आग्रही मागणी केली असल्याची माहिती महाराष्ट्र क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रांती सेनेच्या कोकण विभागातील प्रमुखांची विभागीय बैठक शुक्रवारी शासकीय विश्रमागृह येथे संपन्न झाली. बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत महायुतीकडे आम्ही 10 जागांची मागणी करणार असल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली. सुरेश पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र क्रांती सेनेने राज्यात 15 उमेदवार उभे केले होते. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरुन आमच्या उमेदवारांनी माघार घेऊनमहायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. महायुतीत आम्हाला घटक पक्ष म्हणून सामावून घेतले गेले. आता पक्षाची संघटनात्मक ताकद आम्ही वाढवत आहोत. पश्चिम महाराष्ट आणि कोकणातील मराठासमाज महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाशी जोडला जात आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाचे जाळे विणले जात आहे. राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख व तालुका प्रमुखांची निवड करण्यात येत आहे. अनेक नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य, माजी आमदार आणि माजी खासदार पक्षात येण्यास उत्सुक आहेत, अशी माहिती सुरेश पाटील यांनी दिली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाच्या राज्य कार्यकारणीची बैठक आणि भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणिशिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचा मराठा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.गेल्या 15 वर्षात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांसाठी नेहमी झुलवत ठेवले. मात्र युती शासनाने अनेक धाडसी निर्णय घेत मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आम्ही महायुतीचा घटक पक्ष असल्याने राज्यातील किमान 10 जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची आग्रही मागणी असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र क्रांती सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून रविंद्र साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली.