• MyPassion
कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती.
19 May, 2017

हेरगिरी व घातपाती कारवायांच्या आरोपाखाली भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा योग्यच असल्याचा पाकिस्तानचा दावा धुडकावून लावत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या शिक्षेला गुरुवारी स्थगिती दिली. या प्रकरणी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन योग्यरित्या न केल्याबद्दलही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकला फटाकरले. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाबद्दल भारताने समाधान व्यक्त केले आहे. पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने गेल्या महिन्यात जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर विविध मार्गानी दबाव आणत ही शिक्षा रद्द करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस केंद्र सरकारने याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला. हरीश साळवे यांच्या नेतृत्वाखालील वकिलांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कमपणे मांडली. उभय बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष रॉनी अब्राहम यांच्या अध्यक्षतेखालील ११ न्यायाधीशांच्या पिठाने जाधव यांच्या फाशीची शिक्षा स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. जाधव यांनी इराणमधून बलुचिस्तान प्रांतात प्रवेश केल्यानंतर सुरक्षा दलांनी गेल्या वर्षी ३ मे रोजी त्यांना अटक केली, असा पाकिस्तानचा दावा आहे. मात्र, जाधव हे व्यापारानिमित्त इराणला गेले असताना त्यांचे तेथून अपहरण करण्यात आले, या म्हणण्यावर भारत ठाम आहे. जाधव यांचे प्रकरण हा भारत व पाकिस्तान यांच्यातील तणावाचा सर्वात अलीकडचा मुद्दा ठरला आहे.