• MyPassion
खाडी किनारा विकास प्रकल्पाला गती देण्याच्या पालिका आयुक्तांच्या अधिका-यांना सूचना.
14 Sep, 2019

खाडी किनारा प्रकल्पाच्या मंजुरीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून उच्च न्यायालयानेही महाराष्ट्र सागरी किनारा मंडळाने घातलेल्या अटी आणि शर्थींच्या अधीन राहून काम करण्याची मंजुरी दिली असल्याने या पुढील कालावधीत प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना देतानाच नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी असे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांना सांगितले.पर्यावरणाचा समतोल साधत ठाण्याचा खाडी किनारा सुशोभित करण्यासासाठी महापालिकेच्यावतीने एकूण 32 किमी लांबीचा महत्वाकांक्षी खाडी किनारा विकास प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. यामध्ये खाडीचे जतन, सुशोभिकरण व स्वच्छता या बाबींचा समावेश होता. बेल्जियमस्थित मे. ने पोलिसन या सल्लागार कंपनीने अभ्यास करून आपला सर्वकंष प्रकल्प आराखडा महापालिकेस सादर केला होता. या आराखड्यास एप्रिल, 2013 रोजी महासभेने मान्यता दिली होता.या सर्वकंष आराखड्याच्या धर्तीवर महापालिकेच्यावतीने पारसिक रेतीबंदर, नागला बंदर, कावेसर, वाघबीळ, कोलशेत, साकेत-बाळकुम, कळवा-शास्त्रीनगर व कोपरी-ठाणे या 7 ठिकाणी खाडी किनारा विकास प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले. सदर प्रकल्प हे ठाणे स्मार्ट सिटी लि. अंतर्गत राबविण्यासठी ठाणे स्मार्ट सिटी संचालक मंडळाने मंजुरी दिली असून या सर्व आराखड्यांना महासभेची डिसेंबर 2016 आणि 2017 या कालावधीत टप्प्याटप्प्याने मंजुरी प्राप्त झाली.त्यानंतर महाराष्ट्र खाडी किनारा व्यवस्थापन मंडळाने मार्च 2019 रोजी या प्रकल्प आराखड्यास मंजूरी दिली तर राज्य पर्यावरण प्रभाव आकलन प्राधिकरणाने मान्यता दिली होती. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्यावतीने 9 ॲागस्ट, 2019 रोजी उच्च न्यायालयात परवानगीचा अर्ज सादर केला होता. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन मंडळाने घातलेल्या अटींच्या अधीन राहून दिनांक 9 सप्टेंबर, 2019 रोजी मंजुरी दिली. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज संबंधित सर्व अधिकारी आणि ठेकेदार यांची बैठक घेवून खाडी किनारा विकास प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना केल्या त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी या प्रकल्पासाठी मिळालेल्या सर्व परवानग्यांची माहिती प्रदर्शित करावी असे सांगितले. साधारणतः नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी सर्वांना दिल्या