• MyPassion
खड्डे बुजवण्यासाठी केलेला कामाच्या दर्जावर ठाणेकरांचे प्रश्नचिन्ह.
11 Jul, 2019

पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांवर आणि उड्डाणपुलांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी केलेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेला आहे. एकीकडे खड्डे बुजवत असताना दुसरीकडे ते खड्डे पुन्हा उघडे पडू लागले आहेत. त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मागील वर्षी आधुनिक तंत्रज्ञान वापरून कमी खर्चात, कमी वेळेत खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याला कमी प्रमाणात यश मिळाले. यंदा पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांसह उड्डाणपुलावरही खड्डे पडले. यंदा ठाणे महापालिकेने साडेचार कोटींची तरतूद खड्डे बुजवण्यासाठी केली, मात्र बुजवलेले खड्डे पुन्हा उघडे पडत असल्याने खड्डे बुजवणारे आधुनिक तंत्रज्ञान गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शहरात सध्या 1400 हून जास्त खड्डे पडले आहेत. घोडबंदर, माजिवडा, कळवा, दिवा, वागळे भागात खड्ड्यांचे प्रमाण जास्त आहे. हे खड्डे पेव्हर ब्लॉक, सिमेंट मटेरिअल तर काही ठिकाणी फक्त वाळू टाकून बुजवले जात आहेत. दुसर्या दिवशी बहुतांशी खड्डे पुन्हा उघडे पडल्याचे दिसत आहे. हे खड्डे चुकवताना दुचाकीस्वारांची तारेवरची कसरत होत असून लहान-मोठे अपघात नित्याचीच बाब झाली आहे. माजिवडा पुलाखाली रस्त्याची चाळण झाली असून वाहनचालक जीव मुठीत धरुन वाहने चालवत आहेत, किमान वाहतूक पोलिसांनी पालिका यंत्रणेशी समन्वय साधून या रस्त्याची डागडुजी करणे आवश्यक आहे, अशी तक्रार नागरिक करु लागले आहेत. वाहनांची वर्दळ असलेल्या बहुतांशी रस्त्यांवर हीच परिस्थिती आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार कळवा प्रभागात 104, वागळे प्रभागात 256, दिवा प्रभागात 118, नौपाडा-कोपरी प्रभागात 78, मुंब्रा प्रभागात 60, वर्तकनगर प्रभागात 15 तर लोकमान्यसावरकरनगर प्रभागात 38 खड्डे शिल्लक राहिले आहेत. प्रत्यक्षात मात्र 1400 हून जास्त खड्डे पडल्याचे बोलले जात आहे. बुजवलेले खड्डे पुन्हा उघडे पडत असल्याने अधिकार्यांचा अंकुश ठेकेदारांवर नसल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे