• MyPassion
कनिष्ठ अभियंता तसेच साइट सुपरवायझरची कंत्राटी भरती रद्द करण्याचे आयुक्तांचे आदेश .
09 Jul, 2019

ठाणे महापालिका प्रशासनाने वादग्रस्त पद्धतीने केलेली ५० कनिष्ठ अभियंता आणि साइट सुपरवायझरची कंत्राटी भरती रद्द करण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ही भरती करताना कायदेशीर प्रक्रिया डावलून पालिकेच्या आजी- माजी अधिकाऱ्यांच्या सगेसोयऱ्यांची वर्णी लावण्यात आली होती. पालिकेच्या विविध विभागांमध्ये आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी कंत्राटी भरती समितीची स्थापना करण्यात आली होती. विभाग प्रमुखांनी केलेल्या शिफारशीनुसार या समितीने ५० कनिष्ठ अभियंता आणि साइट सुपरवायझर्स नेमले होते. मात्र, त्यासाठी जाहिरात, अर्ज, मुलाखती या साऱ्या प्रक्रियेला बगल देण्यात आली. तसेच, पालिकेच्या आजी-माजी अधिकाऱ्यांच्या मुलांची आणि नातेवाईकांची त्यात वर्णी लावण्यात आली. ही भरतीच बेकायदा पद्धतीने झाल्याचे वृत्त 'मटा'ने दिल्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावून झाडाझडती घेतली. चुकीच्या पद्धतीने भरती झाल्याचे निष्पन्न झाल्याने ही भरती रद्द करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीचा अवलंब करूनच ही भरती करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.