• MyPassion
कमी पाणी पुरवठा होणा-या ठिकाणी टँकरने निशुल्क पाणी पुरवठा करण्याचा महापालिका आयुक्तांचा निर्णय.
14 May, 2019

शहरात ज्या ज्या ठिकाणी कमी पाणी पुरवठा होत आहे किंवा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे अशा ठिकाणी पालिकेच्यावतीने १५ जूनपर्यंत टँकरद्वारे निशुल्क पाणी पुरवठा करण्याचा तसेच रमजान ईदच्या काळात मुंब्रा येथे टँकरने निशुल्क पाणी पुरवठा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पाणी पुरवठ्यांच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने श्री. जयस्वाल यांनी अधिका-यांच्या आढावा बैठकीत याविषयी चर्चा केली. यावेळी ज्या ठिकाणी महापालिकेच्यावतीने पुरविण्यात येणारा पाणी पुरवठा कमी आहे किंवा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे आणि जे लोक नियमितपणे पाणी कर भरतात त्याठिकाणी १५ जूनपर्यंत महापालिकेच्यावतीने टँकरद्वारे निशुल्क पाणी पुरवठा करण्याचे आदेश त्यांनी दिले. शहरात ज्या ठिकाणी कमी पाणी पुरवठा होतो अशा ठिकाणांची यादी पाणी पुरवठा विभागाने तयार करावी व त्यानुसार पाण्याचे टँकर पुरवावेत. यासाठी वेळ पडल्यास खासगी टँकर ताब्यात घेवून त्यांच्यामार्फतही पाणी पुरवठा करावा असे श्री. जयस्वाल यांनी या बैठकीत स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी महापालिकेची वितरण व्यवस्था नसल्याने पाणी पुरवठा होत नाही त्या ठिकाणी सिटेंक्स टाक्या बसवून त्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा तसेच ज्या ठिकाणी छोटे टँकर जात असतील त्या ठिकाणी छोट्या टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा असे सांगितले. दरम्यान मुंब्रा येथे रमजान ईदच्या काळात शुक्रवारी होणा-या शटडाऊनच्या काळात पहाटे ३ ते ६ या वेळेत टँकरने तसेच इतर दिवशी ज्या ठिकाणी कमी पाणी पुरवठा झाला असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा असे श्री. जयस्वाल यांनी या बैठकीत स्पष्ट केले.