• MyPassion
कळवा येथील नागरिकांसाठी ‘कावेरीसेतू’ ची उभारणी .
07 Jun, 2019

ठाण्यातील तलावपाळी किंवा रोषणाईने चमचमणारे मॉल याकडे विरंगुळ्याकरिता ठाणेकरांचा ओढा असताना ठाण्यालगतच्या कळवा या तुलनेने कनिष्ठ मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या परिसरात तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून सह्याद्री शाळेजवळील नाल्यावरील रस्त्यावर ‘कावेरीसेतू’ उभा आहे. ब्रिटिशकालीन खुर्च्या, आकर्षक महागडे दिवे, शांततेचे प्रतीक असलेल्या गौतम बुद्धांची प्रतिमा, आकर्षक रंगरंगती असा या सेतूच्या परिसरातील थाट आहे. सकाळी व सायंकाळी कळव्यातील किंवा अगदी ठाण्यातील मंडळींनी तेथे विरंगुळ्याकरिता दोन घटका बसावे, अशी या सेतूच्या उभारणीमागील कल्पना आहे. कळव्यात पूर्वी अरुंद असलेले रस्ते आता रुंद तर झाले आहेतच, पण सिमेंट काँक्रिटचे झाले आहेत. अंतर्गत रस्त्यांमुळे बाह्यरस्तेसुद्धा एकमेकांना जोडले गेले आहेत. ९० फुटांचा रस्ता हा तर खारेगावची नवी ओळख मानला जात आहे. त्याच भागात पारसिक चौपाटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे येथील अर्थकारण बदलले आहे. ठाण्यातील घोडबंदर, वर्तकनगर, पोखरण या ठिकाणी जागेला किंवा फ्लॅटला जो दर मिळत आहे, तोच दर कळव्यात सुरू आहे. स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून उभ्या राहत असलेल्या कावेरीसेतूमुळे कळव्याला नवी ओळख प्राप्त होत आहे. कळवा स्टेशनला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणूनही हा सेतू ओळखला जाऊ लागला आहे. येथे फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांकरिता झाडांच्या सावलीत, पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये गप्पा मारण्यासाठी ब्रिटिशकालीन टेबल, खुर्च्या बसवण्यात आल्या आहेत. शिवाय, पाठीमागील बाजूस एक भिंतीचा आकार तयार करून त्यावर शांततेचे प्रतीक असलेल्या गौतम बुद्धांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन पथदिवे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्यांचा किंवा थबकणाºयांचा रेल्वे प्रवासाचा थकवा काही क्षणांतच दूर होणार आहे. सायंकाळच्या वेळी परिसरातील वादक येथे गिटार किंवा व्हायोलीनचे मंद सूर आळवत असतील आणि रसिक त्यांचा आस्वाद घेतील, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. याठिकाणी नाल्यावरील भिंतीवर या भागातील कलाकारांना रोजच्या रोज आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.