• MyPassion
गुडवीन ज्वेलर्सचे दोन्ही मालक न्यायालयात शरण .
14 Dec, 2019

गुडवीन ज्वेलर्सचे दोघेहीमालक बंधूची चहुबाजूने आर्थिक नाकेबंदी केल्याने दोघेही अखेर ठाणे न्यायालयात शरण आले.सुनीलकुमार अकराकरण आणि व्यवस्थापकीय संचालक सुधीरकुमार अकराकरण अशी या भामट्या बंधूंची नावे असून त्यांनी आकर्षक व्याजाचे प्रलोभन दाखवत मुदत ठेवी आणि भिशीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची सुमारे 25 कोटींची फसवणूक करून धूम ठोकली होती.गेल्या अनेक दिवसापासून गुंगारा देणाऱ्या या ठकसेन बंधूंची केरळ आणि तामिळनाडू येथील 20 कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पुरती नाकेबंदी केल्याने शुक्रवारी (ता.13 डिसें.) रोजी दोघेही ठाणे न्यायालयात शरण आले.त्यानुसार,पोलिसांनी दोघांनाही अटक केली.शनिवारी दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.अशी माहिती पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान,या भामट्याविरोधात ठाणे,डोंबिवली,अंबरनाथसह पालघर,वसई,पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातही फसवणुकीचे गुन्हे दाखल असून ठाणे पोलिसांनी गुडवीन ज्वेलर्सच्या मालक व संचालकाविरोधात यापूर्वी लूकआउट नोटीसदेखील जारी केली होती. केरळ राज्यातील त्रिशूर जिल्ह्यात मूळ गाव असलेल्या भामट्या सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण या दोघा बंधूंनी गुडवीन ज्वेलर्सच्या ठाणे पोलीस आयुक्तालयातील ठाणे,डोंबिवली,अंबरनाथसह पालघर,वसई,चेंबूर,पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथे शाखा उघडल्या होत्या.तसेच,वर्षाला16 ते 18 टक्के व्याज व मासिक एक हजार रुपये प्रमाणे वर्षाला 12 हजारसह सोन्याचे दागिने व एक हजार रुपये अशा दोन योजना या भामट्यानी राबवल्या होत्या.त्यांच्या या आकर्षक प्रलोभनाला बळी पडून सुमारे 1154 गुंतवणूकदारांनी अंदाजे 25 कोटींची गुंतवणूक गुडवीनमध्ये केली होती.जून-जुलै 2019 पर्यंत या योजनाचा परतावा देण्याची अंतिम मुदत होती.त्यानुसार,काहींना मोबदला दिला.त्यानंतर दोघांनीही आपला गाशा गुंडाळून पळून जाण्याची योजना बनवली.त्यानुसार,21 ऑक्टोबर रोजी ऐन दिवाळीच्या तोंडावर दुकाने बंद करून कुटुंबासह धूम ठोकली होती.याप्रकरणी,गुडवीनचे मालक सुनीलकुमार अकराकरण, सुधिरकुमार अकराकरण या दोघा भावांसह सचिव सचिन चौधरी,गुडवीनचे व्यवस्थापक वेणुगोपाल, सुब्रमन्यम मेनन आणि प्रदीप यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.दरम्यानच्या काळात,गुडवीनचे मालक सुनीलकुमार आणि सुधीरकुमार यांनी सोशल मीडियावर चित्रफीत प्रसारित करून गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित असून प्रकल्प आणि जागा विकून सर्वांची रक्कम परत करण्याचा दावादेखील केला होता.