• MyPassion
घोडबंदर रोडवर वाहतूककोंडी झाल्यास मेट्रो प्रशासन जबाबदार -आ. प्रताप सरनाईक
20 Mar, 2020

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर रोडवर मेट्रोच्या कामाला सुरवात झाली, त्यावेळी कासारवडवली, भाईंदर पाडा आणि गायमुख येथे उड्डाणपूल बांधून त्यावर मेट्रो पिलर उभारावे, अशी विनंती मेट्रो प्रशासनाला आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. परंतु मेट्रो प्रशासनाने तांत्रिक बाबी लक्षात न घेता मेट्रोच्या कामाच्या निविदांमध्ये उड्डाणपुलाचा अंतर्भाव न करता निविदा काढून कामाला सुरवात केली. आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्थसंकल्पात आधी त्यासंदर्भात लक्षवेधी सूचना टाकली असता मेट्रोने आपली चूक कबुल करून त्या ठिकाणी उड्डाणपुल तयार करण्याचे लेखी आश्‍वासन दिले, परंतु एकदा मेट्रोच्या पिलरची उभारणी झाल्यानंतर त्या ठिकाणी उड्डाणपुल कसे उभारणार? असा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. खरेतर नागपूर आणि मीरा-भाईंदरच्या धर्तीवर एलिवेटेड उड्डाणपुलाची गरज असताना परस्पर मेट्रोचे काम चालू करणे किती योग्य आहे असे प्रश्‍न घोडबंदर रोडवरील नागरिक करत आहेत. त्यामुळे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यासंदर्भात तक्रार केलेली असून या तिन्ही उडडाणपुलासह मेट्रोचे काम चालु करावे अशी विनंती केली आहे. हे काम सोबत झाले नाही तर घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी निर्माण झाली तर मेट्रो प्रशासनाला जबाबदार धरावे असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.