• MyPassion
फन्जीबल एफएसआय घेणार्या बांधकाम व्यावसायिकावर केंद्र सरकारची वक्रदृष्टी.
11 May, 2019

ठाणे महापालिकेकडून टीडीआर प्रोत्साहनपर भूनिर्देशांक फन्जीबल एफएसआय घेणार्या बांधकाम व्यावसायिकावर केंद्र सरकारची वक्रदृष्टी वळली असून अशा प्रकारचा एफएसआय वापर करणार्या बांधकाम व्यावसायिकांना जीएसटी भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठामपाने विकासकांची नावे जीएसटीला कळवावी अशी विनंती करण्यात आल्याने बांधकाम व्यावसायिकांचे धाबे देणाणले आहेत. सेवा आणि वस्तूकर विभागाच्या मुंबई विभागाचे उपसंचालक अरविंद घुगे यांनी ठामपाचे आयुक्त संजीव जयस्वाल यांना 25 एप्रिल रोजी लेखी पत्र पाठवून ठामपा हद्दीतील बांधकाम व्यावसायिकांबद्दल माहिती मागितली आहे. महापालिका हद्दीत 2014 ते 2019 दरम्यान ज्या बांधकाम व्यावसायिकांनी टीडीआर, एफएसआयचा वापर करून इमारती बांधल्या आहेत आणि त्यामधील घरांची विक्री केली आहे अशा विकासकांना महापालिकेने किती चटईक्षेत्र निर्देशांक मंजूर केला, त्यांनी किती टीडीआर घेतला, त्याचा वापर केला का, फन्जीबल भूनिर्देशांकाचा उपयोग करण्यात आला का, 15 टक्के प्रोत्साहनपर भूनिर्देशांक घेऊन त्याचा उपयोग इमारत बांधताना करण्यात आला का, या विकासकांनी सेवा कर भरला होता की नाही, असे सवाल उपस्थित करत जीएसटी विभागाने महापालिका हद्दीत 2014 पासून ते 2019 पर्यंत बांधकाम व्यवसाय करणार्या विकासकांच्या नावाची यादी मागवली आहे. त्याची चौकशी जीएसटी विभागामार्फत केली जाणार आहे. जीएसटी विभागाने घेतलेल्या या भूमिकेमुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.