• MyPassion
ढगांच्या गडगडटासह पावसाची ठाण्यात दमदार हजेरी- पालिकेचा नालेसफाईचा दावा ठरला फोल.
11 Jun, 2019

१० जून ते १२ जून या तीन दिवसात कडाडणाऱ्या वीजा व वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता वर्तवणाऱ्या हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला.पहिल्याच दिवशी सोमवारी रात्री सव्वानऊ वाजल्या पासून ठाण्यात पावसाने दमदार हजेरी लावली.गेले अनेक दिवस उन्हाने काहिली झालेल्या ठाणेकरांना पहिल्याच पावसामुळे वातावरणात थंड गारवा अनुभवास मिळाल्याने दिलासा मिळाला.अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह बरसू लागलेल्या पावसाने ठाणेकरांची तारांबळ उडाली.शहरात बच्चेकंपनीने पहिल्याच पावसात मनमुराद भिजण्याचा आनंद लुटला. पहिल्याच पावसात नालेसफाई कामाचा बोजवारा उडालेला दिसून आला. ठाण्याच्या काही ठिकाणी नाल्यातील असलेला गाळ बाहेर आला होता, चिक्कलवाडी येथील झोपड्यामध्ये पाणी शिरले होते तर आंबेडकर रोड वरील नाल्यावर चक्क कचरा जमा झाल्याने नालेसफाईच्या कामावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे 95 टक्के नालेसफाई चा दावा करणाऱ्या ठाणे महापालिकेचा दावा फोल ठरला असून महापालिकेचे पितळ उघडे झाले आहे. दरम्यान वरवरची नालेसफाई करण्यात आली असून नालेसफाई म्हणजे पैसे कमावण्याचे साधन असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गेल्या 3 महिन्यापासून उन्हाचा कडक्याने लाहीलाही झालेल्या ठाणेकरांना पावसाने पहिल्याच दिवशी झोडपून काढले. खऱ्या अर्थाने आता पावसाला सुरुवात झाली असुन सुखद गारवा ठाणेकरांना मिळाला. पहिल्याच दिवशी पडणाऱ्या पावसामुळे ठाण्याच्या काही ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली, तर पहिल्या पावसाच्या सरीमध्ये ठाणेकरांनी भिजण्याचा आनंद लुटला. बच्चेकंपनी तर पावसामध्ये खेळ मांडला. तर काही ठिकाणी विज खंडित झाल्याने सर्वत्र अंधकार पाहायला मिळाला.