• MyPassion
देशभरातील मराठा संस्थांचे पहिले अखिल मराठा संमेलन होणार ठाण्यात .
20 Aug, 2019

देशभरातील मराठा संस्थांचे पहिले अखिल मराठा संमेलन ठाण्यात होणार आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. २५ ऑगस्टला गडकरी रंगायतनमध्ये दुपारी ४ ते १० या वेळेत हे संमेलन होणार आहे असं संस्थेचे सरचिटणीस राजेंद्र साळवी यांनी सांगितलं. या संमेलनामध्ये विद्यार्थी आणि तरूण पिढीसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर तसंच मराठा संस्थांचे वैचारिक अधिवेशन आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे. करिअर मार्गदर्शनासाठी जनरल विजयराव पवार आणि आयकर आयुक्त उत्तमकुमार चव्हाण येणार आहेत. फारशा परिचित नसलेल्या महसुल क्षेत्रातील करिअर विषयी चव्हाण मार्गदर्शन करणार असल्याचं साळवी यांनी सांगितलं. उद्योजक शिवाजी महाराज या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक प्रा. नामदेव जाधवही मार्गदर्शन करणार आहेत. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा गौरवही केला जाणार आहे. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयसिंह राजेभोसले, कलादिग्दर्शक नितीन देसाई, पुढारीचे संपादक प्रतापराव जाधव, शिक्षण महर्षी दशरथ सगर यांना गौरवलं जाणार असून जगप्रसिध्द अमृत डिस्टीलरीचे उद्योजक निळकंठराव जगदाळे यांना मरणोत्तर गौरवलं जाणार असल्याचं राजेंद्र साळवी यांनी सांगितलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमा होणारा निधी राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. या संमेलनाच्या समारोपाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिक्षणमंत्री आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.