• MyPassion
दसऱ्याच्या दिवशी पारंपरिक पध्दतीने ठाणे पोलीसांनी केली शस्त्रास्त्रांची पूजा.
09 Oct, 2019

दस-याच्या निमित्तानं ठाणे पोलीसांनी आपल्या शस्त्रास्त्रांची पूजा केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही शस्त्रागारात विधीवत आणि पारंपरिक पध्दतीनं पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते हे शस्त्रपूजन करण्यात आलं. दसरा जिवांत क्षात्रभावाचं संवर्धन करतो. शस्त्रांची पूजा ही जिवांत प्रत्यक्ष क्षात्रतेज कार्यरत करण्याचं प्रतिकात्मक रूप आहे. दस-याच्या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा करून देवतांच्या मारक शक्तीला आवाहन करून स्वत:त तळपत असणा-या शस्त्राच्या धारेप्रमाणे क्षात्रतेजाची निर्मिती करून घ्यायची असते. क्षात्रतेजाच्या प्रक्षेपणामुळं जिवांत क्षात्रभाव निर्माण होऊन प्रत्यक्ष मायेतील कर्म करण्यास गती प्राप्त होऊन येणा-या प्रत्येक अडथळ्यांवर सूर्यनाडीच्या आधारे मात करणं शक्य होतं म्हणून दस-याच्या दिवशी क्षात्र लहरींना पूरक अशा प्रतिकाचं म्हणजे शस्त्रास्त्रांचं पूजन करणं हितावह असतं असा समज आहे. ठाणे पोलीसांनी पोलीस मैदानावर विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांची पूजा केली. पूजा झाल्यानंतर पोलीस आयुक्त फणसळकर यांनी उपस्थित पोलीस कर्मचा-यांना सोनं वाटून शुभेच्छा दिल्या. दसरा हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त असल्यानं या मुहुर्तावर सोनं खरेदीची प्रथा आहे. सोन्याच्या खरेदीसाठी आज ग्राहकांनी सराफांच्या दुकानात गर्दी केली होती. मध्यमवर्गीयांमध्ये गुरूपुष्यामृत आणि इतर मुहुर्तांवर एक ग्रॅम का होईना पण सोनं खरेदी करण्याचा प्रयत्न असतो. ठाण्यातील अनेक नामवंत सराफी पेढ्यांनी सोन्याची वळी, नाणी खरेदीसाठी खास व्यवस्था केली होती. सोन्याचा २४ कॅरेटचा दर ३८ हजारांच्या वर गेला असतानाही सोने खरेदीसाठी सराफा पेढ्यांवर गर्दी झाल्याचं चित्र दिसत होतं.