• MyPassion
चोरांवर वॉच ठेवण्यासाठी पालिकेकडून लावण्यात आलेल्या कॅमेरांमुळे होणार पोलिसांना मदत .
08 Jun, 2019

चोरांवर वॉच ठेवण्यासाठी, गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी आणि पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत व्हावी तसेच वाहतुकीचे व्यवस्थापन व नियंत्रण करणे सोपे जावे, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी शहराच्या विविध भागांत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सीसीटीव्हीचे जाळे पसरले जात आहे. आतापर्यंत शहरात १२०० कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांसाठी इंटिग्रेटेड डाटा सेंटर व कमांड आणि कंट्रोल रूम सुविधा सज्ज होत असून त्याचे उद्घाटन येत्या १५ आॅगस्ट रोजी होणार आहे. या यंत्रणेमुळे एखादा वेश बदलून आलेला आरोपीसुद्धा या कॅमेºयांना फसवू शकणार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. मागील काही महिन्यांपासून शहराच्या विविध भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात झाली. गुन्ह्यांची उकल जलदगतीने होण्यासाठी तसेच शांत परिसर, सर्व्हिस रोड आणि हायवेवर बसवण्यात आलेल्या कॅमेºयांची गुन्हेगारांवर नजर ठेवण्यास तसेच वाहतूक नियंत्रित करण्याकरिता चांगली मदत होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नगरसेवक निधीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. ठाणे स्टेशन या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून ३९ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शहराच्या विविध भागांत तब्बल १२०० कॅमेरे बसवण्यात आले असून येत्या काळात आणखी ४०० कॅमेरे बसवले जाणार आहेत. सुरुवातीला २ मेगापिक्सलचे कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे कॅमेरे बसवण्यात आले असून ते चार मेगापिक्सलचे असल्याचे पालिकेने सांगितले. या सीसीटीव्ही कॅमेºयांचे कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर हे हाजुरी येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले असून ते येत्या १५ आॅगस्ट रोजी पूर्णपणे कार्यरत होणार आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून हाजुरी येथे उभारण्यात येत असलेल्या नियंत्रण कक्षासोबत डाटा सेंटरचीही निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. तीन टियर श्रेणीच्या या कक्षाचे काम अंतिम टप्प्यात आहे.