• MyPassion
मोदींनी भारताला बेजबाबदार संघर्षात ढकलू नये, चीनची पुन्हा धमकी
05 Aug, 2017

चीनची आगळीक सुरूच आहे. आता तर चीन सरकारच्या मालकीचा असलेल्या 'ग्लोबल टाईम्स'नं भारताला पुन्हा एकदा इशारा दिलाय. आपलं सैन्य मागे घ्या, नाहीतर चीनचं सैन्य भारतीय सैनिकांना नष्ट करण्यासाठी सक्षम आहे, अशी उघड धमकी या वर्तमानपत्रानं दिलीय. 'ग्लोबल टाईम्स'च्या या अग्रलेखाचा मथळाच, मोदींनी भारताला बेजबाबदार संघर्षात ढकलू नये, असं आहे. सिक्कीममधल्या दोकलाममध्ये भारत आणि चीनमधला तणाव वाढत चाललाय. भारत सैन्य मागे घेणार नाही, पण त्याचवेळेला हेही लक्षात घ्यायला हवं की युद्ध हा पर्याय नाही, वाद चर्चेतूनच सोडवायला हवा, असं सुषमा स्वराज लोकसभेत म्हणाल्या होत्या. त्यावरच चीनच्या वर्तमानपत्रात हा अग्रलेख छापून आलाय. "मोदींनी बेजबाबदारपणे भारताला संघर्षात ढकलू नये. दोन महिन्यांपासूनच्या तणावाचं रुपांतर लष्करी संघर्षात झालं, तर त्याचा निकाल ठरलेला आहे. चीनच्या लष्करानं भारताशी दोन हात करण्यासाठी पुरेशी तयारी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या सरकारला चीनी लष्कराच्या भयंकर ताकदीची कल्पना असायला हवी. चिनी लष्कराला कुणाची स्पर्धाच नाही. जर युद्ध सुरू झालंच, तर सर्व भारतीय सैनिकांना नष्ट करण्याची क्षमता चीनच्या लष्करात आहे. मोदी सरकारनं भारतीयांना खोटं सांगणं बंद करावं. दोन्ही देशांच्या लष्करी ताकदीमधला फरक गेल्या 50 वर्षात खूप वाढलाय. मोदी सरकारला युद्ध सुरू करायचंच असेल, तर त्यांनी त्यांच्या लोकांना निदान खरं तरी सांगावं. चीनशी लढताना आपल्याला अमेरिका आणि जपानचा पाठिंबा आहे, या भ्रमात भारतानं राहू नये. पण मग चीननंच युद्ध का नाही सुरू केलं? याचं कारण असं, की गेल्या 10 वर्षांत सीमेवर शांतता आहे आणि ती चीनला हवी आहे. आम्हाला शांततेला आणखी एक संधी द्यायची आहे, जेणेकरून भारताला संभाव्य विपरीत परिणामांची जाणीव होईल."