• MyPassion
चंद्र व मंगळावर माणूस पाठवण्यासाठी नासाने मोहिमा सुरू कराव्यात – ट्रम्प
13 Dec, 2017

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन अवकाश धोरणावर स्वाक्षरी केली असून, त्यात नासाला चंद्र व मंगळावर अवकाशवीर पाठवण्यासाठी तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. अमेरिका अवकाश संशोधनात नेहमीच आघाडीवर राहील असे ट्रम्प यांनी सांगितले आहे. १९७२ मधील अखेरच्या चांद्रमोहिमेनंतर अमेरिकी अध्यक्षांना पुन्हा चंद्र गाठण्याचे धोरण प्रथमच निश्चित केले आहे. नासाने याआधीच्या काळात चांद्रमोहिमा करण्याचे सोडून दिले होते. ट्रम्प यांनी अवकाश धोरण जाहीर करताना असे सांगितले, की या धोरणाद्वारे मी अमेरिके च्या नासा या अवकाश संशोधन संस्थेला पुन्हा एकदा चंद्रावर लक्ष केंद्रित करण्यास सांगत आहे. १९७२ नंतर समानव चांद्रमोहिमा थांबल्या होत्या, आता त्या सुरू कराव्यात. १९६० ते १९७० दरम्यान अमेरिकी अवकाशवीर चंद्रावर गेले होते. या वेळी आम्ही चंद्रावर केवळ ध्वजच लावणार नाही तर तिथे पदचिन्हे उमटवून मंगळ मोहिमेचीही पायाभरणी करू. कदाचित इतर ग्रहांवरही स्वारी करू, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. प्रेरणादायी भविष्यासाठी मी जाहीर केलेले अवकाश धोरण हे एक मोठे पाऊल आहे व अवकाश क्षेत्रात अमेरिकेची अस्मिता पुन्हा प्रस्थापित करणारी आहे. अवकाश क्षेत्रात बरेच काही करता येण्यासारखे आहे. त्याचे लष्करी उपयोगांशिवाय इतरही उपयोग आहेत, त्यामुळे अवकाश क्षेत्रात आम्ही नेतृत्व करीत राहू व यापुढेही हे प्रयत्न चार पटींनी वाढवले जातील असे त्यांनी स्पष्ट केले.