• MyPassion
वागळे इस्टेट येथे रिक्षावर झाड पडल्याने दोन जण जखमी .
11 Jul, 2019

वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतांना बुधवारी दुपारी रिक्षावर वृक्ष पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. या घटनेत सुदैवाने रिक्षा चालक बचावला आहे. या घटनेमुळे शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिनाभरात अशा प्रकारे वृक्ष पडून झालेल्या अपघातातपाच ते सहा जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेत राजेंद्र विश्वकर्मा हे किरकोळ जखमी झाले असून त्यांचा मुलगा योगेश विश्वकर्मा हा गंभीर जखमी झाला आहे. या दोघांना उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही उल्हासनगर भागात राहणारे असून ते बुधवारी ठाण्यात पासपोर्टच्या कामासाठी आले होते. यावेळी त्यांनी रिक्षा पकडून पासपोर्ट आॅफीसकडे जात होते. रिक्षा वागळे इस्टेट भागातील एमटीएनएलच्या कार्यालयाजवळ आली असता, त्या ठिकाणी असलेला भलामोठा वृक्ष या रिक्षावर पडला. त्यावेळेस रिक्षा चालक श्रीराम यादव यांच्या बाजूला योगेश बसला होता. त्याच्या डोक्याला या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. तर मागील सिटवर त्याचे वडील राजेंद्र बसले होते. त्यांच्या हाताला दुखापत झाली असून या दोघांनाही उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातातून रिक्षा चालक सुदैवाने बचावला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन विभागाचे पथक दाखल झाले. त्यानंतर वृक्ष रस्त्यातून हटविण्यात आला आहे. परंतु या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात आजच्या घडीला १५० च्या आसपास धोकादायक वृक्ष असल्याची माहिती सुध्दा यापुर्वीच समोर आली आहे. तर मागील महिना भरात वृक्ष पडून पाच ते सहा जण जखमी झाले आहेत.