• MyPassion
एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केली अटक .
07 Oct, 2019

एटीएम मशीन फोडून रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्य टोळीला मालमत्ता गुन्हे कक्षाने अटक केली. आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात सर्व आरोपी जामिनावर आहेत. या टोळीमध्ये एक रिक्षाचालकाचाही समावेश आहे.पर्वतसिंग चुंडावत, राजसिंग ठाकूर , अमोल यादव अशी या आरोपींची नावे आहेत. मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाने ठाण्यातील बाळकुम साकेत रोडवर सापळा लावून या टोळीला पकडले. आरोपी ठाणे, कल्याण परिसरात राहतात. आरोपींच्या चौकशीत कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एटीएम फोडून पैशाची चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. आरोपींविरुद्ध ठाणे, मुंबई, ठाणे ग्रामीण आणि राजस्थानमध्येही गुन्हे दाखल आहेत. ही एक सराईत टोळी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पर्वतसिंग याच्याविरुद्ध मुंब्रा, देवगड पोलिस (राजस्थान) पोलिस ठाण्यात हत्येचे दोन गुन्हे दाखल आहेत. राजसिंग याच्याविरुद्ध २०१२ ते २०१६ या कालावधीमध्ये दहिसर, वसंत पार्क पोलिस ठाणे (चेंबूर), भांडुप, मिरा रोड, अमेठ (राजस्थान) पोलिस ठाण्यात हत्या, दरोडे, जबरी चोरीसह इतर असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. शिवाय हा आरोपी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात फरारी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. रिक्षाचालक असलेला अमोलविरुद्ध श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून सध्या हे आरोपी जामिनावर आहेत.या आंतरराज्य टोळीला अटक करण्यास मालमत्ता गुन्हे कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप भानुशाली, सहाय्यक पोलिस निरीक्षक मिलिन पिंगळे, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप भोईर यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.